Satara Rain Update: पहिल्याच पावसात वाहून गेला 90 कोटींचा रस्ता, महाबळेश्वर-तापोळा वाहतूक ठप्प…!

 

                               पुरंदर रिपोर्टर Live 

सातारा-महाबळेश्वर :प्रतिनिधी 

                जिल्ह्यात पश्चिमेकडील तालुक्यामध्ये गुरुवारी सकाळपासून पावसाने थैमान घातले असून, धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. महाबळेश्वर तालुक्यात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरूच आहे. पश्चिमेकडील जनजीवन विस्कळीत झाले.या पावसामुळे नव्याने तयार झालेला महाबळेश्वर ते तापोळा रस्ता चिखली शेड परिसरात वाहून गेला असून, सुमारे अर्धा रस्ता दरीत ढासळला आहे. 

या परिसरात घरांचीही पडझड होऊन नुकसान झाले. या पावसामुळे देवसारे पूल पाण्याखाली गेल्याने काही गावांचा संपर्कही तुटला आहे. दरम्यान, कण्हेर धरणातून विसर्ग करण्यात येणार असल्याने वेण्णा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीर धरणातील पाणी पातळी वाढल्याने धरणाच्या विद्युत गृहातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

                              सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील वाई, महाबळेश्वर, सातारा, जावली, पाटण, कराड या तालुक्यांमध्ये गुरुवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सरी कोसळत असून, या पावसाने ठिकठिकाणी नुकसान केले आहे. महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा मुख्य मार्गाचे काम काहीच महिन्यांपूर्वी पूर्णत्वास गेले होते. पहिल्याच जोरदार पावसात हा रस्ता अक्षरशः वाहून गेला. यामुळे ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तापोळा रस्त्यावरील चिखली शेडपासून काही अंतरावर मुख्य रस्ता दोन ठिकाणी खचला आहे. रस्ता दरीच्या दिशेला वाहून गेला असून, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक आता पर्यायी मांघर मार्गाने सुरू आहे. तर दरड कोसळून माती, झाड मुख्य रस्त्यावर आले होते. जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्याचे काम बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले.


                धुवाँधार पावसाने मोळेश्वर गावातील ज्ञानदेव जंगम यांच्या घराचे छत कोसळले असून, भिंतीलाही तडे गेले आहेत. याचबरोबर संरक्षक भिंतही पूर्णपणे कोसळली आहे. कुंभरोशी गावातील यशवंत सावंत यांच्या घराच्याही भिंती पडल्या आहेत. कुरोशीतील शिवराम शिंदे यांच्याही घराची पडझड झाली आहे.

तालुक्यातील दुर्गम भागातील देवसरे गावाकडे जाणारा पूल

संततधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. तर दुर्गम उचाट,आकल्पे व शिंदी भागामध्ये पोल पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. महाबळेश्वर तापोळा या मुख्य रस्त्यासह रेणोशी-उचाट रस्ता, चतुरबेट दाभे खरोशी रेनोशी अहिर दरे शिंदी रस्ता वर काही प्रमाणात माती खाली आली होती.


कोसळलेल्या दरडी हटवल्या...


महाबळेश्वर ते तापोळा रस्त्यावरील झोळाची खिंडमधील खचलेला रस्ता दुरुस्तीचे काम सुरू आहे. या मार्गावरील 27 कि.मी. भागाची पाहणी केली आहे. यामध्ये 100 मीटर घाट लांबीत काही ठिकाणी दरड रस्त्यावर आल्या. तीन जेसीबीद्वारे या दरडी हटवण्यात आल्या. या कामाची पाहणी बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांनी केली.


मातीचा राडारोडा रस्त्यावर आल्याने धोका


महाबळेश्वरमधील लॉडविक पॉईंटच्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच तालुक्यातील वाघैरा फाट्यापासून वेंगळे ते गोगवे दिशेने जाणार्‍या रस्त्यावर वेंगळे गावच्या हद्दीत मातीचा राडारोडा रस्त्यावर आल्याने वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.

Post a Comment

0 Comments