पुणे | प्रतिनिधि
शहरातील येरवडा परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात राहणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षीय मुलाला मारहाण करून, टॉवेलच्या काठाच्या दोरीने गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संतोष किसन कुंभार (वय ४९, रा. चर्होली फाटा) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना मंगळवारी (१० जून) सकाळी सव्वा नऊ वाजता पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातील बराक क्रमांक २ मध्ये घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या उद्योग केंद्रात गुन्हेगारी कृत्यांमध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलांना ठेवले जाते. बराक २ मध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाला बाथरूम साफ करण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्याने नकार दिल्यामुळे त्याचा तेथील इतर मुलांशी वाद झाला. या वादाचे रूपांतर झटापटीत झाले आणि पाच अल्पवयीन मुलांनी त्याला मारहाण करत शिवीगाळ केली.
यानंतर त्यांनी टॉवेल फाडून त्याच्या काठाच्या दोरीने गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, हे सर्व घडत असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकाने वेळीच हस्तक्षेप करून संबंधित मुलाचा जीव वाचवला.
या प्रकरणी येरवडा पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.
0 Comments