निरा नगरपंचायत करण्याचा ठराव नामंजुर - निरा ग्रामस्थांचा तीव्र विरोध -निरेतील सातबारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड बनविण्याची मागणी!



                       पुरंदर रिपोर्टर Live 

निरा :विजय लकडे

          पुरंदर तालुक्यातील  सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायत किंवा नगरपरिषदेत रूपांतर करण्यासाठी सोमवारी ( दि.९) झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी नगरपंचायत करण्यास कडाडून विरोध करून ठराव बहुमताने नामंजुर ‌केला.  नीरा येथील मिळकतींचा सातबारा बंद करून त्याचे प्रॉपर्टी कार्ड बनविण्या साठी तसेच नीरा गावची हद्दवाढ होण्यासाठी ग्रामपंचायतीने राज्यशासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. एकंदरीतच काही दिवसांपासून सुरू असलेली नीरा नगरपंचायत करण्याच्या विषयाची चर्चा तुर्तास तरी थांबली आहे.


         निरा येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायत किंवा नगरपरिषदेत रूपांतरण करण्याकरिता काही ग्रामस्थांनी  ग्रामसभा घेण्याकरिता  उपोषण केले होते. तर अनेक ग्रामस्थांनी त्याला विरोध केला होता. अखेर निरा ग्रामपंचायतीने  सोमवारी ( दि.९) शिवतक्रार वार्ड नं.पाचमधील भैरवनाथ मंदीरात विशेष ग्रामसभा आयोजित केली. यावेळी सरपंच तेजश्री काकडे अध्यक्षस्थानी होत्या.

            यावेळी उपसरपंच राजेश काकडे, माजी जि.प.सदस्य विराज काकडे, चंदरराव धायगुडे, लक्ष्मणराव चव्हाण,बाळासाहेब भोसले, बाळासाहेब ननवरे, टी.के.जगताप,दादा गायकवाड ,योगेंद्र माने, सुजाता दगडे, वसंत दगडे, यांच्यासह ग्रा.पं. सदस्य, बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

           निरा नगरपंचायत किंवा नगरपरिषद झाल्यास शिवतक्रार येथील शेतक-यांच्या जमिनी आरक्षित होतील तसेच निरेेतील मिळकतदारांना व व्यापा-यांना करवाढीसह अनेक गोष्टींचा सामना करावा लागेल   याबाबत माजी ग्रा.पं. सदस्य  राजेश चव्हाण यांनी मुद्देसुद विचार व्यक्त करत भीती व्यक्त केली. तसेच  निरा येथील मिळकतींचे असलेले सातबारे बंद करून त्याची सिटी सर्व्हे रेकॉर्डला नोंद व्हावी यासाठी ग्रामपंचायतीने राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली.निरा नगरपंचायत करण्यास राजेश चव्हाण , सुदाम बंडगर, सचिन धायगुडे,  कल्याण जेधे,  तसेच अनेक ग्रामस्थ, व्यापारी व शेतक-यांनी तीव्र विरोध  केला. याला प्रकाश कदम यांनी अनुमोदन दिले. 

             ग्रा.पं. सदस्य अनिल चव्हाण, प्रमोद काकडे यांनी नगरपंचायत होताना शेतक-यांच्या जमिनी जाणार असतील तर त्याला आमचा विरोध असून यावर पर्याय म्हणून neera गावची हद्दवाढ व मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड  होवून गावठाण होणे करिता ग्रामपंचायतीने महसूल खात्याकडे प्रयत्न करावे अशी मागणी केली.

           सरपंच तेजश्री काकडे यांनी सांगितले की, ग्रामसभेत अनेक नागरिकांचा व शेतक-यांचा  नगरपंचायत करण्यास विरोध पाहता नीरा गावाला नगरपंचायतीची गरज नसून ग्रामस्थांची  नीरा - शिवतक्रार ग्रामपंचायतच रहावी अशी मागणी आहे. तसा ग्रामसभेचा ठराव घेऊन उद्या वरिष्ठांकडे पञव्यवहार करीत आहोत.

          तर नीरा गावची हद्दवाढ व मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड बनविण्यासाठी महसुलमंञ्यांकडे पञव्यवहार करणार असल्याचे उपसरपंच राजेश काकडे यांनी ग्रामसभेत सांगितले.

Post a Comment

0 Comments