पुरंदर रिपोर्टर Live
बारामती : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या होमिओपॅथी डॉक्टरांबाबतच्या निर्णयाविरोधात बारामती आयएमए (इंडियन मेडिकल असोसिएशन) कडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, शुक्रवार, ११ जुलै रोजी २४ तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा याला अपवाद असणार आहेत.
डॉक्टरांचा तीव्र विरोध….!
होमिओपॅथी डॉक्टरांना एक वर्षाचा ब्रिज कोर्स पूर्ण केल्यानंतर ॲलोपॅथी औषधे लिहून देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारा असून, हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी बारामती आयएमएच्या वतीने करण्यात आली आहे. १९ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरात याविरोधात आंदोलन केले जाणार आहे.
या निर्णयाविरोधात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आयएमए बारामतीचे अध्यक्ष डॉ. संतोष घालमे, सचिव डॉ. अमोल भंडारे, खजिनदार डॉ. सौरभ निंबाळकर, तसेच कार्यकारिणीतील अनेक डॉक्टर उपस्थित होते.
नेमकं प्रकरण काय ?
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, फार्माकॉलॉजीत एक वर्षाचा ब्रिज कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र यादीत केली जाणार आहे. १५ जुलैपासून ही नोंदणी सुरू होणार आहे. त्यानंतर अशा डॉक्टरांना अॅलोपॅथी औषधे लिहून देण्याचा अधिकार दिला जाईल.
आयएमएचा विरोध का?
आयएमएच्या मते, हा निर्णय शास्त्रोक्त शिक्षण प्राप्त एमबीबीएस डॉक्टरांच्या अभ्यासक्रमाशी बरोबरी करणारा नसून, यामुळे रुग्णांच्या जिवाशी धोका निर्माण होऊ शकतो. होमिओपॅथी शिक्षण पूर्णपणे वेगळ्या पद्धतीवर
आधारित असून, त्या माध्यमातून आलेले प्राथमिक ज्ञान ॲलोपॅथीच्या अत्याधुनिक उपचारांची जागा घेऊ शकत नाही.न्यायालयात प्रलंबित विषय आयएमएने यापूर्वीच फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाचा निर्णय आलेला नसतानाही शासनाने निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली, हे न्यायव्यवस्थेचेही उल्लंघन असल्याचा आरोप डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्यास धोका आहे ?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत चुकीचे निदान किंवा औषधोपचार झाल्यास रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या बंदमुळे रुग्णसेवांवर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता इतर वैद्यकीय गरजांसाठी पर्यायी व्यवस्था करून ठेवणे आवश्यक ठरणार आहे.
0 Comments