दौंड, (पुणे):प्रतिनिधि
ओढ्यात पडलेल्या मुलाला वाचविताना आईचा व पाण्यात पडलेल्या तिच्या मुलाचा अशा दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवकरवाडी (ता. दौड) येथील गणेशनगर शिवारात रविवारी (दिनांक -२७) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
निर्मला अनिल दरेकर (वय-30) व हर्षद अनिल दरेकर ( वय - 10) अशी मायलेकरांची नावे आहेत. ओढ्याची खोली जास्त असल्यामुळे त्यांना वाहत्या पाण्याचा नेमका अंदाज आला नसल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षर्शिनी सांगितले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल दरेकर हे कुटुंबीयांसोबत देवकरवाडी (ता. दौड) हद्दीतील गणेशनगर परिसरात राहत असून त्या ठिकाणी त्यांची
शेती आहे. शेतामध्ये पत्नी निर्मला दरेकर या उसाच्या शेतामध्ये मिरचीचे रोपे लावत होत्या. त्यानंतर बांधावर आंब्याची कोय लावत असताना शेजारीच खेळत असलेल्या लहान हर्षदही ओढ्याच्या कडेला झाड लावण्याचे अनुकरण करत होता. नकळत तो ओढ्याच्यापात्रात पडला.
यानंतर काही मिनिटांतच आईच्या लक्षात आल्यावर तीनेही आरडाओरडा करत शोधाशोध केली असता मुलगा ओढ्याच्या पाण्यात पडल्याचे लक्षात आले. निर्मला यांनीही ओढ्यात जात मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याही ओढ्यात वाहत गेल्या. निर्मला यांचा आरडाओरडाचा आवाज ऐकून काही वेळाने त्यांचे सासरे सोपान आले असता त्यांनी दोघांना पाण्यातून काढत राहु येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी यवत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, दोघांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत यवत पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
0 Comments