बारामती | विजय लकडे
पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उद्या (१३ जुलै) बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असून, ‘सहयोग सोसायटी’मध्ये जनता दरबार भरवून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. मात्र, या दौऱ्यात काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर फूट पडण्याची शक्यता आहे..!
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ निंबाळकर, दौंड तालुकाध्यक्ष विठ्ठल खराडे, आणि इंदापूर तालुकाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रिशीर सूत्रांकडून मिळाली आहे.
हे तीनही तालुका अध्यक्ष जर राष्ट्रवादीत दाखल झाले तर नक्कीच काँग्रेसला बारामती लोकसभा कार्यक्षेत्रात मोठा धक्का मानला जाईल. या तीन तालुक्यांमधील काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर बारामतीतील पक्षाचं बळ टिकून आहे. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाची ताकद केवळ संख्येनेच नाही, तर प्रभाव आणि नेतृत्व पातळीवरही खचून जाईल. याशिवाय, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप भाजपमध्ये प्रवेश करनार या चर्चाना उधाण आहे , त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत चाचपणीही सुरू केली आहे.
भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यांनीदेखील अलीकडेच काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे ..!
या घडामोडींमुळे काँग्रेस पक्ष बारामती लोकसभा क्षेत्रात आणि एकंदर पुणे जिल्ह्यात कमकुवत होत चालल्याचं स्पष्ट होत आहे. काही महिन्यांपूर्वी कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सतत होणाऱ्या या राजकीय गळतीमुळे काँग्रेसचे बळ दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. हा ओघ थांबणार आहे की पुढे अजूनही नेते व कार्यकर्त्यांचा पलायन सुरूच राहणार?हा प्रश्न आता उभा राहिला असून, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, जर ही गळती अशीच सुरू राहिली, तर पुणे जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आता ही शक्यता केवळ चर्चा राहते की प्रत्यक्षात उतरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागले आहे.
0 Comments