पुरंदर : विजय लकडे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे. अशातच पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसणार आहे. पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची तारखी निश्चित झाली असून पुरंदरमध्ये मोठा मेळावा घेत ते 16 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
याआधी माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर कसबा पेठ मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. आता संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशा निश्चित झाल्याने पुरंदर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच उत्सुक आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात 'मिशन लोटस' पाहण्यास मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर संजय जगताप पक्षांतर्गत नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यांचा थोपटेंसोबत भाजप प्रवेश होणार होता. मात्र स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे तो मार्ग बंद झाला होता, असे सांगितले जाते. आता मात्र त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.
पुरंदर तालुक्यात संजय जगताप यांच्या कुटुंबीयांचा काँग्रेसवर मजबूत प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो. दुसरीकडे, भाजपसाठी पुरंदर मधील आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी तसंच बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये आपला धबधबा वाढवण्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये जगताप यांच्या पुरंदर मधील प्रभावाचा भाजपला फायदा होणार आहे.
सध्याची महायुती सरकार - शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र असून त्यात भाजप पुण्यात आपले वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. पुणे शहरामध्ये भाजपची ताकद असली तरी जिल्ह्यामध्ये मात्र अजित पवारांचे मोठं वर्चस्व आहे तसेच सेनेची ताकद देखील भाजप पेक्षा उजवी आहे. त्यामुळेच रणनीतीचा भाग म्हणून थोपटे आणि आता संजय जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला जात असून त्यातून भाजपची ताकद वाढवली जात आहे.
याबाबत पुरंदर रिपोर्टर शी बोलताना भाजप जिल्हा अध्यक्ष शेखर वडणे म्हणाले, 16 तारखेला पुरंदर मध्ये मोठा मेळावा घेऊन संजय जगताप यांचा प्रवेश होणार आहे. या प्रवेशाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रवेशाला अद्याप तरी वेळ मिळालेली नाही. मात्र त्यांची वेळ घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वडणे म्हणाले.
0 Comments