पदासाठी हव्यास की सत्तेचा खेळ ? नावापुढे सरपंच पद लागावं म्हणून दर तीन महिन्यांनी सरपंच बदलण्याचा विचित्र फंडा....!

 

             पुरंदर रिपोर्टर Live 


खेड : प्रतिनिधी 

                      स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेल्या व्यक्तीला पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी संधी मिळते. मात्र खेड तालुक्यातील दावडी ग्रामपंचायतीत सरपंचपदाची संकल्पना वेगळी करण्यात आली असून, येथे प्रत्येक तीन महिन्यांनी सरपंच बदलला जातो आहे . केवळ नावापुढे “सरपंच” लागावे, म्हणून सत्ताधाऱ्यांनी ठरवून हे 'रोटेशन पद्धती'चे मॉडेल तयार केल्याने सध्या या गावाची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे.



राज्यघटनेनुसार गावचा प्रमुख म्हणजे सरपंच आणि गावाच्या विकासाची जबाबदारी ही सरपंचावर असते . गावच्या गरजांनुसार योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करणे, निधीचे योग्य वाटप करणे, लोकांच्या समस्या सोडवणे ही सर्व महत्त्वाची कामे सरपंचाच्या माध्यमातूनच केली जातात. मात्र दावडी ग्रामपंचायतीत सत्ताधारी गटाच्या ८ सदस्यांनी तीन-तीन महिन्यांनी सरपंचपदाची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.



दावडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संतोष सातपुते यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ग्रामपंचायतीत एकूण १३ सदस्य असून आमच्या गटाचे ८ सदस्य आहेत. प्रत्येकाला सरपंच होण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही सर्वांनी मिळून ठरवले की प्रत्येक सदस्याला तीन महिन्यांसाठी सरपंचपद दिले जाईल. त्यामुळे सध्या प्रत्येकाचा कार्यकाळ तीन महिनेच असतो.”


ग्रामविकासाच्या दृष्टीने सरपंचपद हे केवळ शोभेचे नसून एक जबाबदारीचे पद आहे. नवीन सरपंचाला गावच्या गरजांचा अंदाज घेण्यासाठी किमान सहा महिने लागतात. त्यामुळे तीन महिन्यांत सातत्यपूर्ण योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करणे शक्य होते का, हा खरा प्रश्न आहे.




Post a Comment

0 Comments