पुणे:कोंढवा
कोंढव्यातील उच्चशिक्षित तरुणीने कथित बलात्काराच्या खोट्या तक्रारीने संपूर्ण शहरात खळबळ उडवली होती. मात्र, तपासाअंती तिच्या तक्रारीतील आरोप खोटे असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांची दिशाभूल केल्यामुळे तिच्यावरच आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कोंढव्यात काही दिवसांपूर्वी एका कुरिअर बॉयने तरुणीवर बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर महिला सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त करण्यात आला होता. तथापि, तपासात धक्कादायक बाब समोर आली. बलात्कार झालाच नव्हता. तरुणीने आपल्या परिचित मित्राविरोधात खोटे आरोप करत पोलिसांनाही चुकीच्या दिशेने वळवले होते.
कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी संबंधित तरुणीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या खालील कलमांनुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. खोटी माहिती देणे, खोटे पुरावे तयार करणे, व पोलिसांना त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करण्यास प्रवृत्त करणे. न्यायालयाच्या परवानगीने दखलपात्र गुन्हाही लवकरच दाखल केला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
तक्रारीनुसार, कुरिअर बॉय म्हणून घरी आलेल्या व्यक्तीने तिला स्प्रे मारून बेशुद्ध केल्यावर अत्याचार केला, असा दावा या तरुणीने केला होता. पण तपासात निष्पन्न झाले की, हा युवक तिचाच जुना मित्र होता आणि गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात ओळख होती. तो तिच्या घरी गेल्यानंतर, त्याच्या जाण्यानंतर, त्या तरुणीने त्याच्यासोबतचा एक फोटो एडिट करून 'पुन्हा येईन' असा मजकूर टाकत बनाव उभा केला.
या खोट्या आरोपामुळे केवळ एक सामान्य युवक बदनामीला सामोरा गेला, तर पोलिसांचाही अमूल्य वेळ आणि संसाधनांचा अपव्यय झाला. याप्रकरणी आता
न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या खोट्या तक्रारींमुळे खऱ्या पीडित महिलांवर परिणाम होतो, असे सांगून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments