नांदेड: प्रतिनिधी
अर्धापूर तालुक्यातील एका गावात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तीन तरुणी त्यांच्या मित्रांसोबत लॉजवर गेल्याची घटना समोर आली आहे. यापैकी एका तरुणीच्या अल्पवयीन भावाला याची माहिती
मिळाल्यानंतर त्याने लॉजवर जाऊन बहिणीलाआणि तिच्या मित्राला रंगेहाथ पकडले. त्यानंतर मोठा राडा झाला आणि हा वाद थेट खंजर हल्ल्यापर्यंत गेला.
ही घटना 21 जुलै रोजी दुपारी घडली. अर्धापूर तालुक्यातील तीन तरुणी महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. कॉलेज सुटल्यानंतर त्या आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून तामसा रोडवरील 'हॉटेल गारवा' लॉजवर गेल्या. त्यातील एका तरुणीच्या अल्पवयीन भावाला याबद्दल माहिती मिळताच तो आपल्या दोन मित्रांसह लॉजवर पोहोचला.
भावाने लॉजच्या खोलीत जाऊन बहिणीला तिच्या मित्रासोबत पाहिल्यावर त्यांच्यात वाद झाला. घाबरलेल्या तरुणीने पहिल्या माळ्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र यात तिचा एक हात मोडला. दरम्यान, भावाने आपल्या मित्रांसोबत मिळून त्या तरुणाला लॉजबाहेर ओढत नेले आणि भोकर फाट्याजवळ नेऊन त्याच्यावर खंजराने हल्ला केला. तरुणाच्या पोटात खंजर भोसकण्यात आला असून तो गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. जखमी तरुणीवरही सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा सहभाग आणि लॉजवर चाललेली हालचाल या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणात एक धक्कादायक वळण आले आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, 21 जुलै रोजी तीन तरुणांनी आम्हा तिघींना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून लॉजवर नेले आणि आमच्यावर अत्याचार केला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तिघांवर अत्याचार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच वेळी, मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीसह इतर दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि इतर पुरावे तपासत आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले की, सखोल तपास सुरू आहे आणि सर्व बाजू समोर आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.
0 Comments