पुरंदर : प्रतिनिधि
विभागीय उप आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, सागर धोमकर यांच्या आदेशानुसार आणि निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली २२ जुलै २०२५ रोजी पुरंदर तालुक्यातील भोसलेवाडी व जेजुरी गावाच्या हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारू बनवणाऱ्या दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत सुमारे ₹3,94,500 किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
ही कारवाई विभागीय भरारी पथक, पुणे विभागाच्या पथकाने केली. भोसलेवाडी गावातील टेमजाई माता मंदिराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत आणि जेजुरी गावच्या हद्दीत बारामती- जेजुरी रोडलगत ओढ्याच्या काठावर हे दोन अड्डे कार्यरत होते. छाप्यात एकूण ५,५५० लिटर रसायन, १,८५५ लिटर अवैध गावठी हातभट्टी दारू आणि दारू तयार करण्याचे साहित्य जप्त व नष्ट करण्यात आले. या प्रकरणात संबंधित व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ अंतर्गत कलम ६५ ब, क, ई, फ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
कारवाईचे नेतृत्व दुय्यम निरीक्षक धिरज सस्ते यांनी केले. त्यांच्या पथकात जवान शशीकांत भाट, संदीप सुर्वे आणि ऋतिक कोळपे सहभागी होते. पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सस्ते करीत आहेत.
0 Comments