आई स्वप्नात म्हणाली – ‘माझ्याकडे ये’… नीटची तयारी करणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या;आत्महत्येपूर्वीची मन सुन्न करणारी चिठ्ठी…!

 

             पुरंदर रिपोर्टर Live 

सोलापुर :  प्रतिनिधि 

                सोलापूरमधील एका धक्कादायक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोलापूर भागातील म्हाडा कॉलनीमध्ये 16 वर्षीय विद्यार्थ्यांने शिवशरण भुताळी तळकोटी याने मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या स्वप्नात त्याची आई आली होती. आणि आईने आपल्याला तिच्याकडे बोलावलं आहे म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

                     शिवशरण हा खूप हुशार विद्यार्थी होता. तो सोलापूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करत होता. शिवशरण आधी पुण्यातील केशवनगरमध्ये राहत होता. पुण्यातील कोंडवा येथे शिक्षण घेतलेल्या शिवशरणला दहावीमध्ये ९२ टक्के गुण मिळाले होते. त्याची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची होती. अशातच ३ महिन्यांपूर्वी आईच्या निधनानंतर तो मामाच्या घरी सोलापूरला राहायला आला. शिवशरण हुशार होता त्याला डॉक्टर व्हायचे होते. म्हणून तो मामाकडे शिकायला आला. शिवशरण याचे वडील पुण्यात एका खासगी शिक्षण संस्थेत जेमतेम वेतनावर काम करत आहेत.


     आईच्या अचानक जाण्याने शिवशरण खूपच खचला होता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात गेला होता. यातूनच त्याने मामाच्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्याने एक पत्र देखील लिहिलं आहे. त्याचे हे पत्र वाचून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.


पत्रात नेमक काय लीहिलय ..?

मी शिवशरण स्वतःच्या इच्छेने मरत आहे. मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होते पण मी मामा आणि आजीचे तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचे कारण म्हणजे आई काल स्वप्नात आली होती. 'तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये...' असे म्हणत तिने मला बोलावले. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे आणि आजीचे खूप आभार मानतो कारण त्यांनी मला खूप साथ दिली. माझे लाड पुरवले. मामा, मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा. मामा, मला तुला एक सांगायचं आहे. आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आईबाबांपेक्षा जास्त केलंस. त्याबद्दल धन्यवाद.' असं त्याने आत्महत्या करण्यापूर्वी पत्रात लिहिलं आहे.

Post a Comment

0 Comments