बारामती | प्रतिनिधी
बारामती शहराजवळील भाडोत्री खोलीत अल्पवयीन मुलीवर आम्रपाल सक्सेना (मूळ गाव मिरकापूर, जि. हरदोई, उत्तर प्रदेश) याने शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना बारामती तालुका पोलिसांनी त्याला अटक केली.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीचे कुटुंब उत्तर प्रदेशातील जोधपूर जिल्ह्यातील असून कामानिमित्त बारामतीत स्थायिक झाले आहे. पीडित मुलीचे आई-वडील बारामती एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतात.
गुरुवारी (दि.१४ ) रोजी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दरम्यान, पीडिता घरासमोर खेळत असताना आरोपी आम्रपाल सक्सेना याने तिला “खायला देतो” असे सांगून आपल्या खोलीत नेले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.
दरम्यान या घटनेनंतर पीडित मुलीची प्रकृती बिघडली. ती घरात झोपून राहिली. रात्री आठच्या सुमारास आई कामावरून घरी परतल्यावर मुलीची तब्येत ठीक नसल्याचे तिच्या लक्षात आले. चौकशीअंती मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने बारामती पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी आम्रपाल सक्सेना याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
0 Comments