निंबूत (लकडे वस्ती) | प्रतिनिधी
निंबूत (लकडे वस्ती) येथे २०१८ साली स्थापन झालेल्या साई सेवा गणेश तरुण मंडळाने स्थापनेपासून समाजात जातीय सलोखा व बंधुत्वाचा अनोखा संदेश दिला आहे. गेल्या आठ वर्षांपासून मंडळात असलेले एक मुस्लिम कुटुंब गणपती उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवत असून सर्व उपक्रमांमध्ये अगदी हिरीरीने सहभागी होत आहे.
विशेष म्हणजे, या कुटुंबाकडून दरवर्षी गणपती बाप्पाच्या प्रसादाची सेवा पुरवली जाते. मंडळाच्या स्थापनेच्या पहिल्या वर्षी गणपती बाप्पाच्या पहिल्या आरतीचा मानही याच मुस्लिम कुटुंबाला—अल्लाउद्दीन सय्यद व त्यांच्या धर्मपत्नी हसीना सय्यद यांना देण्यात आला होता. तेव्हापासून आजतागायत पहिली आरती करण्याचा मान हे कुटुंब भूषवत आहे.
गणपती उत्सवातील धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो, तसेच कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता गणपती बाप्पाची सेवा करण्याची परंपरा त्यांनी आजवर कायम ठेवली आहे. मंडळाच्या उपक्रमांमधून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडते.
याशिवाय, मंडळाकडून स्थापनेपासून महिलांसाठी, मुलींसाठी आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जात आहेत. गणपती उत्सवातून साई सेवा मंडळाने सामाजिक सलोखा, एकता आणि बंधुत्वाचा आदर्श संपूर्ण परिसरासमोर घालून दिला आहे.

0 Comments