दौंड : प्रतिनिधी
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर तीन मोटार गाडींमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात २ जणांचा मृत्यू झाला तर इतर ५ जण जखमी झाले. अशोक विश्वनाथ थोरबोले (वय ५७, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) व गणेश धनंजय दोरगे (वय २८, रा. यवत, ता. दौंड) असे जागीच मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि. २०) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.
अपघात प्रकरणी अधिक माहिती अशी आहे की, मयत अशोक थोरबोले आणि त्यांचे कुटुंब त्यांचे मुळगाव गोजवडा (ता. वाशी, जि. धाराशिव) येथे वडिलांच्या मासिक कार्यासाठी स्विप्ट कार (एमएच १२ टीवाय ७५३१) मधून गेले होते. ते पुन्हा सोलापूर महामार्गाने पुण्याकडे परतत होते. त्यांची कार यवत गावच्या हद्दीतील शेरु हॉटेलजवळ आली.
यावेळी पुणेकडून यवतकडे जाणारी स्विप्ट कार (एमएच १२ युडब्ल्यु ५०५२) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजक ओलांडून कार सोलापूर महामार्गावर आली. यावेळी दोन्ही गाड्यांमध्ये जोराची धडक झाली. तसेच पाठीमागून येणारी गाडीची (एमएच १२ एनयु ५५०१) सुद्धा धडक बसली.
या भीषण अपघातात अशोक थोरबोले आणि गणेश दोरगे यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर पाच जण जखमी झाले. जखमींना यवत येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मयत अशोक थोरबोले यांचे भाऊ ज्ञानेश्वर विश्वनाथ चोरबोले यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी स्विप्ट कारवरील चालक राकेश मारूती भोसले (रा. बोरीभडक, ता. दौंड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद भोसले करीत आहेत.

0 Comments