दौंड : प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील सहजपूर गावातील उमेश म्हेत्रे या तरुणाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हेत्रे यांनी नवी दिल्ली येथील राज्यसभा सचिवालयात निवडणूक निर्णय अधिकारी पी. सी. मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे आपला अर्ज सादर केला. यासोबतच त्यांनी 15,000 रुपयांची अनामत रक्कमही जमा केली आहे.
अतिशय साध्या कुटुंबातून आलेल्या तरुणाने देशातील दुसऱ्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे सोशल मीडियावर आणि स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रातील एका छोट्या गावातील युवकाने दाखवलेले हे धाडस अनेकांना प्रेरणादायी वाटत असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
उपराष्ट्रपतीपदासाठी पात्रता अटी:
भारतीय नागरिक असणे आवश्यक
वय किमान 35 वर्षे पूर्ण
राज्यसभा सदस्यत्वासाठी पात्रता असणे
कोणतेही लाभाचे पद धारण नसणे
अर्जासाठी 20 प्रस्तावक आणि 20 अनुमोदक खासदार आवश्यक
15,000 रुपये अनामत रक्कम जमा करणे आवश्यक
या अटी असूनही म्हेत्रे यांनी दाखवलेले हे धाडस सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. या घटनेमुळे उपराष्ट्रपती निवडणुकीच्या प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

0 Comments