पुरंदर रिपोर्टर live
निरा-पुरंदर
राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते शिवतक्रार गावठाण या मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर शासन आणि प्रशासनाविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता निरा-शिवतक्रार येथील अहिल्यादेवी होळकर चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्याचे माजी सभापती दत्ताजी चव्हाण यांनी दिली .
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब असून, शाळेत जाणारी लहान मुले, महिला, दुचाकी-चारचाकी वाहनधारक, वृद्ध तसेच पायी चालणारे नागरिक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याच रोडवरून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी रोज ये जा करत असतात, सरकारी दवाखाना याच रोड वरती असल्यामुळे वैद्यकीय सुविधे साठी अनेक नागरिक याच रस्त्याचा वापर करतात तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या आंदोलनाची माहिती बारामतीच्या खासदार, पुरंदर चे आमदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, स्थानिक पोलीस प्रशासन यांना आधीच पत्राद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी मोठ्या संख्येने नागरिक या धरणे आंदोलनाला उपस्थित राहून आपला रोष व्यक्त करणार आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार,
“गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी करत आहोत. निवडणुकीच्या काळात आश्वासनं दिली जातात, पण काम मात्र होत नाही. आता रस्त्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल.”

0 Comments