बारामतीत अवैधरित्या होणाऱ्या गौण खनिज उत्खननावर कारवाईस सुरुवात – तहसीलदार कार्यालयाचा आदेश

बारामती-प्रतिनिधी  

              बारामती शहर आणि तालुक्यामध्ये काही ठिकाणी परवानगीविना अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून  वाहनांद्वारे वाहून नेल्याची गंभीर बाब समोर आली असून, त्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार बारामती कार्यालयाकडून संबंधित अधिकार्‍यांना या गौण खनिज वाहतुकीविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



तहसीलदार गणेश शिंदे यांनी ३० जुलै रोजी काढलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी आणि परवानगी शिवाय गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या संदर्भात  मंगलदास तुकाराम निकाळजे (जिल्हाध्यक्ष – पुणे जिल्हा पूर्व, वंचित बहुजन युवा आघाडी) यांनी २८ जुलै रोजी तहसीलदार कार्यालयाकडे लेखी निवेदन दिले होते.


तहसीलदारांनी आदेशात स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र गौण खनिज उत्तखनन (विकास व विनियमन) नियम २०१३ आणि विविध कायद्यानुसार गौण उत्खननासाठी परवानगी आवश्यक असते. तरी देखील काही ठिकाणी हे उत्खनन बेकायदेशीरपणे सुरु असल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, महसूल यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संयुक्त पथकांमार्फत कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.


यामुळे आगामी काळात गौण खनिज माफियांवर कारवाई होण्याची शक्यता असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments