भोर : प्रतिनिधी
शिंदेवाडी गावच्या हद्दीत जुन्या कात्रज बोगद्याच्या अलीकडील डोंगरात सापडलेल्या तरुणाच्या खुनाचा राजगड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उलगडा करून आरोपींना गजाआड केले आहे. जलद गतीने कारवाई करत पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून तीन विधीसंर्घषित बालकांसह एकूण सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी डोंगरावर फिरायला गेलेल्या एका पादचाऱ्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर हा परिसर त्यांच्या हद्दीत येतो हे स्पष्ट झाले. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर तो सौरभ खामी आठवले (२५, रा. मांगडेवाडी, पुणे, मूळ सोलापूर) असल्याचे समजले. आठवले याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात १८ ऑगस्ट रोजी मिसिंगची तक्रार दाखल होती.
प्राथमिक चौकशीत मृत तरुणाचे कोणाशी वैर होते याचा ठोस पुरावा पोलिसांना मिळत नव्हता. मात्र, डी.बी. पथकातील पो. शि. अक्षय नलावडे यांनी तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने महत्त्वाचा धागा मिळवला. या माहितीवरून हा खुन काही युवकांनी आणि विधीसंर्घषित बालकांनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांना गुप्त बातमी मिळाली की आरोपी चौघे जण गोगलवाडीच्या चर्तुमुख मंदिराजवळ येणार आहेत. त्यानुसार साध्या वेशात पथकाने सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. श्रीमंत अनिल गुज्जे (२१, रा. वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (१९, रा. वडगाव मावळ), नितीन त्र्यंबक शिंदे (१८ वर्षे ५ महिने, रा. गोकुळनगर कात्रज, मूळ रा. लातूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत तर उर्वरित तीन जण विधीसंर्घषित बालक आहेत.
चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. विधीसंर्घषित बालक (अ) हा मांगडेवाडी येथे आत्याकडे राहत होता. त्याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, मृत सौरभ आठवले हाच त्या मुलीच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहत होता व तिला बहिण मानून शाळेत तिची ने-आण तो करत असे. या गोष्टीमुळे आठवलेने अल्पवयीन मुलीच्या घरी हे प्रेमसंबंध उघड केले. परिणामी, बालक (अ) याला मांगडेवाडी सोडून वडगाव मावळ येथे जावे लागले आणि प्रेमसंबंध बिघडले.
या कारणावरून मनात संताप धरून बालक (अ) याने मित्रांसह आठवलेचा खुनाचा कट रचला. योजना आखून आठवलेला बोलावून कात्रज बोगद्याजवळ नेण्यात आले. तेथे कोयत्याने व इतर हत्यारांनी वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली काळी अॅक्टिव्हा स्कूटर, स्प्लेंडर मोटारसायकल, तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तसेच खुनासाठी वापरलेली हत्यारेही हस्तगत झाली असून तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हाताला लागले आहेत.
सदर प्रकरणी बीएनएस कलम १०३(१) व्यतिरिक्त आर्म्स ॲक्टची कलमे (४/२५) व अन्य वाढीव कलमे जोडण्यात आली आहेत. अटक आरोपींना भोर न्यायालयात हजर केले असता २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पो. उपनिरीक्षक अजित पाटील, म. पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई व डी.बी. पथकातील पोलीस कर्मचारी सागर गायकवाड, सागर कोंढाळकर, मदने, कोल्हे, माने, राणे, तळपे, मेस्त्री, नलावडे, भडाळे, कुंभार यांनी ही कारवाई केली.

0 Comments