BARAMATI | बारामतीत अपघातांची मालिका: डंपरखाली येऊन वृद्धाचा मृत्यू..नागरिकांमध्ये संतापाच वातावरण..!

      


  बारामती | प्रतिनिधी 

                         बारामती शहरात रस्ते अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. बारामतीत सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच एका भीषण अपघातात बाप आणि दोन लेकींचा बळी गेला होता. त्या जखमांचे डाग अजूनही ताजे असतानाच आज पुन्हा एकदा बारामती शहर हादरलं. डंपरखाली चिरडल्या गेल्याने एका वृद्धाने आपले आयुष्य गमावले आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.



डंपरखाली आल्याने वृद्धाचा मृत्यू


          सदरचा अपघात बारामती शहरातील ठिकाण फलटण चौक, येथे दुपारी सव्वा बारा वाजता घडल्याची माहिती आहे. या अपघातात मारुती उमाजी पारसे वय ७६ राहणार आनंदनगर, बारामती  यांचा जागीच मृत्यू झाला आहे. शेळके कन्स्ट्रक्शनचा हायवा डंपर बारामतीमध्ये प्रवेश करत असताना, सायकलवरून जात असलेले मारुती पारसे अचानक डंपरच्या खाली आले. डंपर खाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.


नागरिकांचा संताप,तणावपूर्ण वातावरण

                                 या अपघातानंतर परिसरातील नागरिकांचा संताप प्रचंड वाढला आहे. अपघातानंतर नागरिकांनी हायवा डंपरवर दगडफेक केली. फलटण चौक परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी हायवा डंपर चालकांवर कठोर कारवाई न होण्याबद्दल तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. संतप्त नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन छेडले. पोलिस आणि प्रशासनावर गंभीर दुर्लक्षाचा आरोप करण्यात आला आहे. अपघातानंतर काही दिवस चर्चा होते, पण प्रत्यक्ष कारवाई मात्र होत नाही, असं म्हणत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.





Post a Comment

0 Comments