Baramati | अध्यक्षपदावरून सुप्रिया सुळे यांचा पत्ता कट! सुळेंना हटवून सुनेत्रा पवार यांची निवड..!

 

               पुरंदर रिपोर्टर Live 


बारामती | प्रतिनिधी 

                              पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती या संस्थेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलामुळे बारामतीच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.


बारामतीत उभारण्यात आलेल्या या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभ्यागत मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. राज्यातील बृहन्मुंबईतील तसेच बृहन्मुंबई व्यतिरिक्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित रुग्णालयांसाठी ही पुनर्रचना करण्यात आली असून, त्याचाच भाग म्हणून बारामतीतील समितीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

या मंडळाच्या सदस्यपदी ज्योती नवनाथ बल्लाळ, डॉ. कीर्ती सतीश पवार, डॉ. सचिन कोकणे, श्रीनिवास वायकर, डॉ. दिलीप लोंढे, अविनाश गोपने आणि बिरजू मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर सुप्रिया सुळे यांची नियुक्ती झाली होती; मात्र आता त्यांच्या ऐवजी सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

समितीचा कालावधी दोन वर्षांचा असणार आहे. तथापि, नवीन समिती स्थापन होईपर्यंत विद्यमान समिती कार्यरत राहील. या समितीच्या बैठका दोन महिन्यांतून किमान एकदा होणे आवश्यक असून, अध्यक्षांच्या निर्देशानुसार आवश्यक असल्यास अधिक वेळा बैठका बोलावल्या जाऊ शकतात. कोणताही सदस्य सलग दोन बैठकींना अनुपस्थित राहिल्यास त्याचे सभासदत्व रद्द होईल. मात्र, योग्य आणि सबळ कारण असल्यास शासनाची परवानगी घेऊन सभासदत्व कायम ठेवता येईल.

समितीच्या प्रत्येकी बैठकीची सूचना किमान 10 दिवस आधी सदस्यांना कार्यसूचीसह पाठविणे बंधनकारक असेल. तसेच वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक, मुंबई यांना कोणत्याही बैठकीस उपस्थित राहण्याचा अधिकार राहील आणि त्या वेळी त्यांना समिती सदस्यांचे हक्क व दर्जा मिळेल. प्रत्येक बैठकीचा अहवाल बैठकीनंतर एक आठवड्याच्या आत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला पाठवावा लागणार आहे.

रुग्णालय अभ्यागत समितीच्या अशासकीय सदस्यांना बैठकीसाठी प्रवास भत्ता देण्यात येणार आहे. बैठकीसाठी गणसंख्येची अट लागू राहणार नाही. मात्र, सदस्यांनी आपल्या सूचना किंवा अभिप्राय थेट वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता किंवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना कळवावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

समितीच्या विचारार्थ विषयांमध्ये जनतेच्या तक्रारींचा अभ्यास करणे, रुग्णालय कर्मचाऱ्यांचा वक्तशीरपणा, वर्तणूक आढावा घेणे यांचा समावेश असेल. समितीसमोर आलेल्या तक्रारींची चौकशी करून अहवाल समितीसमोर मांडला जाईल आणि आवश्यक असल्यास योग्य त्या शिफारशीसह तो शासनाकडे पाठवला जाईल.

या निर्णयामुळे बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीला राजकीय व सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, हा बदल स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे.


Post a Comment

0 Comments