दौंड :प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील कुरकुंभ (ता. दौंड) येथे भर चौकात घडलेल्या एका अपघाताने संतापाची लाट पसरली आहे. शाळेतून घरी जात असताना एका शाळकरी मुलीला वेगाने आलेल्या डंपरने धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत होऊन हाड मोडल्याची माहिती समोर आली आहे.
पहा व्हिडिओ 👇👇
मिळालेल्या माहितीनुसार, पांढरेवाडी येथील श्रावणी जाधव (वडील श्रीकांत जाधव हे ग्रामपंचायत सदस्य) ही मुलगी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी परतत होती. त्यावेळी कुरकुंभ चौकातून जात असताना मागून आलेल्या डंपरने तिच्या सायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत ती डंपरच्या चाकाखाली सापडली. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेनंतर चौकात उपस्थित नागरिकांनी तात्काळ मुलीला मदत केली आणि डंपर चालकाला थांबवून त्याला जाब विचारला. मात्र, चालकाने उलट स्थानिकांशी उद्धटपणे वागायला सुरुवात केली यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यांनी चालकाला मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी काही जणांनी चालकाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
दरम्यान, डंपरचालकांच्या मुजोर वागण्यामुळे वारंवार असे अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी बारामतीत झालेल्या भयंकर अपघातात दोन लहान मुलींसह त्यांचे वडील यांचा मृत्यू झाला होता. तरीसुद्धा प्रशासनाकडून डंपरचालकांवर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
गावागावातून, चौकातून आणि गजबजलेल्या रस्त्यांवरून डंपर वेगाने चालवले जात असल्याने नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. त्यामुळे या चालकांच्या बेफिकीर आणि बेजबाबदार वागण्यावर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा असे अपघात थांबणार नाहीत, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.


0 Comments