Baramati | बारामतीत धक्कादायक प्रकार! महिला हवालदार लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात; पोलिस ठाण्यात खळबळ



 बारामती : प्रतिनिधी 

              बारामती तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार अंजना बिभीषण नागरगोजे (वय ३८, रा. निमिर्ती विहार, रुई, बारामती) यांना आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. गेट जामीन देऊन अटक टाळण्यासाठी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर २० हजार रुपये घेण्याचे ठरले होते.



२ सप्टेंबर २०२५ रोजी तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची जबाबदारी नागरगोजे यांच्याकडे होती. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि जामीन प्रक्रियेसाठी लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबीकडे केली. त्यानंतर पडताळणी करूनच पोलीस ठाण्यात कारवाई राबवण्यात आली.


एसीबीच्या पथकाने हवालदार नागरगोजे यांना २० हजारांची लाच स्वीकारताना पकडलं. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले, सहाय्यक उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्वदा सावळे व त्यांच्या पथकाने केली.


दरम्यान, पोलिस ठाण्यातच महिला पोलीसाने लाच स्वीकारल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे.


Post a Comment

0 Comments