बारामती | प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पारवडी गावातील इंगळे वस्तीवर जागेच्या किरकोळ वादातून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या मालकीच्या जागेत बाथरूम बांधण्याच्या कारणावरून झालेल्या वादात काका आणि मुलाने पुतण्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी बापलेकाला ताब्यात घेतले आहे.
घटनेचा तपशील..
ही घटना बुधवारी (१० सप्टेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मृत युवकाचे नाव सौरभ विष्णू इंगळे (वय २४) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जागेत बाथरूम बांधल्याचा वाद निर्माण झाला. यावरून सौरभने काका रामचंद्र जगन्नाथ इंगळे आणि चुलत भाऊ प्रमोद रामचंद्र इंगळे यांना जाब विचारला. शाब्दिक वाद वाढताच दोघांनी मिळून सौरभला बेदम मारहाण केली.
रुग्णालयात मृत्यू
मारहाण झाल्यानंतर सौरभच्या चुलत भावांनी त्याला तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या घटनेनंतर संशयित प्रमोद आणि रामचंद्र पोलिस ठाण्यात गेले व सौरभविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांना सौरभच्या मृत्यूची माहिती मिळाली. यापूर्वी सौरभने मारहाणीबाबत पोलिसांना पूर्वसूचना दिल्याची माहितीही समोर आली आहे.
पोलिसांचा तपास
बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या निरीक्षक वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. “जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीमुळे युवकाचा मृत्यू झाला असून, दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरू आहे,” असे पाटील यांनी सांगितले.
या घटनेमुळे इंगळे वस्ती आणि परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबातील किरकोळ वादाचे इतक्या गंभीर परिणाम होणे दुर्दैवी ठरल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, शवविच्छेदन अहवाल आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.


0 Comments