Crime | नर्तकीच्या प्रेमात अडकलेल्या माजी उपसरपंचाची टोकाची कृती; नर्तकीच्या घरासमोर गोळ्या झाडून आत्महत्या, पोलिसांनी नर्तकी ताब्यात घेतली..


                पुरंदर रिपोर्टर Live 

सोलापूर : प्रतिनिधि 

                     बार्शी तालुक्यातील सासुरे गावात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ३४ वर्षीय माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी एका नर्तिकेच्या घरासमोर स्वतःवर पिस्तूलाने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ते लुखामसाला गावचे माजी उपसरपंच होते. या प्रकरणी पोलिसांनी २१ वर्षीय नर्तिका पूजा गायकवाड हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, ही घटना प्रेमसंबंध आणि मालमत्तेशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवारी सकाळी सासुरे गावात पूजा गायकवाड यांच्या घरासमोर एक गाडी उभी होती. गाडीच्या ड्रायव्हर सीटवर गोविंद बर्गे रक्तबंबाळ अवस्थेत मृत आढळले. त्यांनी उजव्या कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. गोविंद हे विवाहित असून, त्यांना दोन मुले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यात व पूजामध्ये प्रेम संबंध होते.

गोविंद यांच्या मेहुण्याच्या फिर्यादीनुसार, गोविंद यांनी पूजाला सोन्या-चांदीचे दागिने आणि दोन लाखांचा महागडा फोन भेट दिला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांचा संपर्क तुटला होता, ज्यामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. फिर्यादीत असा दावा आहे की, पूजा त्यांना त्यांचा गेवराईतील बंगला तिच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकत होती. तसेच तिच्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट तिने गोविंद यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिली होती. याच तणावातून गोविंद यांनी सासुरे गावात पूजाच्या घरासमोर आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हंटल आहे.



दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण चव्हाण यांनी फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी आता पूजाला ताब्यात घेतले असून, तिची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येची नोंद झाली असली, तरी पुढील तपासात इतर बाबींचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे सासुरे गावात आणि परिसरात खळबळ उडाली आहे.


Post a Comment

0 Comments