पुरंदर रिपोर्टर Live
सोमेश्वरनगर │ प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील होळ गावच्या सरपंच पदावर सुरज कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी सरपंच उज्वला संतोष होळकर यांनी नुकताच आपला राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते. या पदासाठी आलेल्या निवडणूक प्रक्रियेत फक्त सुरज कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी निवड बिनविरोध झाली.
या निवडणुकीसाठी दहा सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन पारवे यांनी काम पाहिले. निवड जाहीर होताच गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. होळ गावात फटाक्यांची आतषबाजी करून, कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमध्ये सुरज कांबळे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
सुरज कांबळे हे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष , पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत . त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे होळ गावात समाधानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना सुरज कांबळे म्हणाले, "गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास कायम ठेवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. संभाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली होळ गावाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे."
गावात पाणीपुरवठा, रस्ते, वीज, स्वच्छता, शिक्षण, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, तसेच महिलांच्या स्वयंसहायता गटांना बळकटी देणे या प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
गावकऱ्यांनीही या निवडीचे स्वागत करत सुरज कांबळे यांच्याकडून नव्या विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली आहे. .
यावेळी विठ्ठल वायाळ, जनार्दन होळकर, लालासो होळकर, आबाजी वायाळ, राजेंद्र गाढवे, राजेंद्र होळकर, मिलिंद वायाळ, सचिन राक्षे, हनुमंत भंडलकर, नंदकुमार कांबळे, मधुकर कांबळे, प्रमोद वायाळ, संतोष होळकर, नंदकुमार होळकर, रामदास करचे इत्यादी उपस्थित होते.



0 Comments