Purandar | गुळुंचे पंचायत समिती गणातून दिशा कांचन निगडे यांच्या उमेदवारीची चर्चा; राष्ट्रवादीतून तरुण नेतृत्व पुढे येणार?



निरा – प्रतिनिधी

                     पुरंदर तालुक्यातील नीरा-कोळविहिरे जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारीसाठी रस्सीखेच चांगलीच रंगली असून, गुळुंचे पंचायत समिती गणातही राजकीय तापमान वाढले आहे. या पार्श्वभूमीवर दिशा कांचन निगडे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे.




गुळुंचे गावातील कांचन निगडे हे समाजकारण आणि राजकारण क्षेत्रातील परिचित नाव. ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला. वाचनालय सुरू करणे, दारूबंदी मोहिम, शैक्षणिक सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व आरोग्य शिबिरे यांसारख्या उपक्रमांतून त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले.


कांचन निगडे यांनी माजी कृषिमंत्री दादा जाधवराव यांच्यासोबत काम करताना “मुलुखमैदानी तोफ” अशी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पुणे जिल्हा युवक उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.



आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कन्या दिशा निगडे (B.Sc Agri, MBA Finance, Malaysia Internship) राजकारणात उतरू इच्छित आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना समाजकारणाची आवड जोपासणाऱ्या दिशाने गुळुंचे पंचायत समिती गणातून उमेदवारीचा मानस व्यक्त केला आहे.

                               उपमुख्यमंत्रीअजित पवार, खा. सुनेत्रा पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती चेअरमन दिगंबर दुर्गाडे , राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी असलेले  निकट संबंध पाहता, दिशाला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार का? याकडे गुळूंचेकरांचे लक्ष लागले आहे.  


सध्या कांचन निगडे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असून राज्य प्रवक्ता पदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या कार्याचा वारसा आता दिशा निगडे यांच्या माध्यमातून पुढे नेण्याची तयारी दिसत आहे.

Post a Comment

0 Comments