बारामती: प्रतिनिधी
बारामती येथील एका नामांकित उद्योगपतीवर बलात्काराचा गंभीर आरोप झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ‘रियल डेअरी’ या कंपनीचे मालक मनोज कुंडलिक तुपे यांच्यावर पुण्यात एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची आणि आरोपीची ओळख २०२१ मध्ये बारामती येथे झाली होती. आरोपीने स्वतःला मोठा उद्योगपती असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने पीडितेला आणि तिच्या मैत्रिणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.
दरम्यान मे २०२१ मध्ये पीडिता पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी राहायला आली. त्या काळात तिचे आरोपी तुपे यांच्याशी सतत संपर्क होत होते. तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२१ मध्ये आरोपीने गाडीत जबरदस्ती केली आणि नंतर विविध हॉटेलमध्ये नेऊन लग्नाचे आमिष देत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, पीडितेचे वर्ष २०२२ साली लग्न झाले होते. मात्र, २०२३ मध्ये ती नवऱ्यापासून विभक्त झाली. त्यानंतरही आरोपीने लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध ठेवले.
२०२५ मध्ये लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने समाजातील प्रतिष्ठेचा हवाला देत लग्नाला नकार दिला. तसेच प्रेग्नन्सी टाळण्यासाठी जबरदस्तीने गोळ्या दिल्याचाही आरोप पीडितेने पोलिसांकडे केला आहे. या तक्रारीवरून हडपसर पोलीस ठाण्यात मनोज तुपे यांच्याविरोधात बलात्कार, धमकी आणि फसवणूक अशा विविध कलमांखाली (IPC 376, 506 इ.) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ही घटना वर्ष २०२१ ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. एक नामांकित उद्योगपती अशा गंभीर प्रकरणात अडकला असल्याने बारामती परिसरात तसेच उद्योगजगतात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याने या प्रकरणातील पुढील पोलिस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



0 Comments