Baramati | निंबूत कांबळेश्वर जिल्हा परिषद गटातून पार्थ पवार किंवा जय पवार यांना उमेदवारी द्यावी. सतीशराव काकडे यांची अजित पवार यांच्या समोरच मागणी.

 

     निंबुत: बारामती 

                          उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दशकांत बारामती तालुक्यात अभूतपूर्व विकास घडवून आणला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, उद्योग आणि कृषी क्षेत्रात केलेल्या कामांमुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलला आहे. या विकासाची गती कायम राखण्यासाठी आणि पुढील पिढीला जबाबदारी देण्यासाठी शेतकरी नेते सतीशराव काकडे यांनी महत्त्वाची मागणी पुढे केली आहे.



काकडे म्हणाले, “अजितदादांनी विकासाची परंपरा निर्माण केली आहे. ही गती कायम ठेवायची असेल, तर आता नव्या पिढीला पुढे आणणं गरजेचं आहे.” यासाठी त्यांनी निंबूत गटातून युवा नेते पार्थ पवार किंवा जय पवार यांना जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी मागणी थेट अजितदादांकडे केली.



सतीशराव काकडे यांच्या या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही पाठिंबा दिला. “अजितदादांनी विकासाचा पाया रचला आहे. आता त्या पायावर नव्या पिढीने उभारणी करावी,” असे मलिक म्हणाले. त्यामुळे आता अजित पवार कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दरम्यान, निंबूत येथे झालेल्या श्रीराम मंदिर, भैरवनाथ मंदिर आणि मदिना मस्जिद यांच्या उदघाटन कार्यक्रमात अजितदादा उपस्थित होते. या प्रसंगी झालेल्या शेतकरी मेळाव्यात माजी मंत्री नवाब मलिक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रामदास काकडे, संतोष सपकाळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



कार्यक्रमात सतीशराव काकडे यांनी मंदिर आणि मशिदीच्या एकत्र उदघाटनाचा धर्मीय ऐक्याचा संदेश दिला. “अजितदादांनी प्रत्येक गावासाठी सढळ हाताने मदत केली. त्यातूनच निंबूत गावाचा विकास साध्य झाला,” असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments