निरा: प्रतिनिधी.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक दशकांपासून पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही एक विचारधारा बनली आहे. मात्र, आज शरद पवार आणि अजितदादा पवार हे दोन वेगवेगळ्या राजकीय मार्गावर असल्याने कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नीरा येथील युवा नेते अॅड. पृथ्वीराज चव्हाण यांनी पवार कुटुंबाच्या एकतेची भावनिक मागणी व्यक्त केली आहे.
चव्हाण यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे,
“शरद पवार साहेब आमचे विचारगुरू आहेत आणि अजितदादा आमचे व्यवहारगुरू. या दोघांमधील मतभेद हे मतभेद नसून एकाच विचारधारेतील दोन दिशांचा प्रवास आहे. पण महाराष्ट्राला दिशा देणारे हे दोघे जेव्हा एकत्र असतात, तेव्हाच राज्याला स्थैर्य आणि विकास मिळतो.”
ते पुढे म्हणतात,
> “काहीजण या दोघांमध्ये मतभेद वाढवण्यात रस घेत आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे की जर पवार कुटुंब एकत्र आलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्या कुणालाच स्थान राहणार नाही.”
चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या दोन गटांमुळे मतदारांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावरही भाष्य करत म्हटलं —
> “पवार साहेबांचा आणि अजितदादांचा मतदार एकच आहे — विकासावर विश्वास ठेवणारा आणि राष्ट्रवादी विचारधारेवर प्रेम करणारा. पण या मतविभाजनाचा फायदा विरोधकांना होतोय.”
शरद पवार, अजितदादा, सुप्रिया ताई आणि रोहितदादा हे चार आधारस्तंभ पुन्हा एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
> “सत्ता बदलत राहते, पदं येतात-जातात, पण विचार आणि रक्ताचं नातं कायम असतं. महाराष्ट्राला गरज आहे अनुभवाच्या शरद पवारांची, कार्यक्षमतेच्या अजितदादांची, संवेदनशीलतेच्या सुप्रियाताईंची आणि नव्या विचारांच्या रोहितदादांची,” असं ते म्हणाले.
चव्हाण यांनी शेवटी भावनिक शब्दांत प्रार्थना केली —
> “माझं राजकीय जीवन या विचारधारेतूनच सुरू झालं. महाराष्ट्राच्या हितासाठी पवार कुटुंब पुन्हा एकत्र यावं, हीच माझी मनापासूनची इच्छा आहे.”
या वक्तव्यामुळे पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. अनेक तरुण कार्यकर्ते त्यांच्या भावना व्यक्त करत “पवार कुटुंब एकत्र आलं पाहिजे” अशीच हाक देताना दिसत आहेत.




0 Comments