Sikandar Sheikh | पपला गुर्जर टोळीशी संबंध? आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखला अटक; कुस्ती क्षेत्रात खळबळ!

 


कोल्हापूर : प्रतिनिधी 

                         आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा आरोप पोलिस तपासात समोर आला आहे. प्राथमिक चौकशीत राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदरचे संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.



मात्र, सिकंदरच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळले असून “आमच्या मुलाला खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे,” असा दावा त्यांनी केला आहे. या घटनेमुळे राज्यातील कुस्ती क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.


सिकंदर शेखचं नाव यापूर्वीही राज्यभर चर्चेत आलं होतं. पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी 2023 च्या माती गटातील अंतिम लढतीदरम्यान पंचांच्या निर्णयावरून निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर झालेलं सोशल मीडिया ट्रोलिंग हे चर्चेचं प्रमुख कारण ठरलं होतं. अनेकांनी पंचांच्या निर्णयावर टीका करत सिकंदरच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट्स केल्या होत्या, ज्यामुळे कुस्ती क्षेत्रात वातावरण तापलं होतं.



यानंतर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखने विजय मिळवत मानाची गदा पटकावली होती. या विजयाने त्याने आपली क्षमता आणि प्रभुत्व सिद्ध केलं. त्यापूर्वी पंढरपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात सिकंदरने “मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी आहे” असं वक्तव्य करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. हे वक्तव्य भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा साखर कारखान्यावर आयोजित “भीमा केसरी” स्पर्धेत करण्यात आलं होतं.



मात्र, आता अवैध शस्त्र तस्करीच्या प्रकरणात अटकेमुळे सिकंदर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या समर्थकांनी पोलिस कारवाईवर प्रश्न उपस्थित केले असून काहींनी त्याच्या विरोधातही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


Post a Comment

0 Comments