आगामी बारामती नगरपरिषद निवडणुकीत राजकीय तापमान चांगलंच चढण्याची चिन्हे आहेत. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप पुरस्कृत आघाडी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष — अशा तिहेरी लढतीला बारामती सज्ज झाली आहे. महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजप या दोन्ही पक्षांनी बारामतीत एकमेकांविरोधातच निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे या निवडणुकीचा रंग अधिकच गडद झाला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी, सोमवारी (१७ नोव्हेंबर), सर्वच पक्षांकडील इच्छुकांची झुंबड उडाली. शेवटच्या क्षणाला अर्ज भरून देण्यासाठी उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याने नगरपरिषद कार्यालयात अक्षरशः जनसागर उसळला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून नेमके तीन वाजता दरवाजे बंद करण्यात आले आणि आतमध्ये असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सदाशिव सातव यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. तर भाजप पुरस्कृत आघाडीकडून गोविंद देवकाते यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार दोन दिवसांत जाहीर होईल, अशी माहिती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष युगेंद्र पवार यांनी दिली.
बारामतीच्या राजकारणात या तिहेरी लढतीमुळे चुरस वाढली असून, कोणाचा पलडा जड ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




0 Comments