बारामती -विजय लकडे
शिवा काका कारंडे फाउंडेशन तर्फे दिवाळीच्या निमित्ताने “किल्ले बनवा स्पर्धा” या उपक्रमाचे आयोजन सोमेश्वर नगरच्या पंचक्रोशी मध्ये करण्यात आले होते. शिवकालीन इतिहास व संस्कृतीचा सुंदर संगम घडवणाऱ्या या उपक्रमात सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील सोरटेवाडी, करंजे पूल, होळ, आठ फाटा, कांबळेश्वर व इतर गावांतील बालगोपाळ, युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत मुलांनी शिवकालीन किल्ल्यांच्या अप्रतिम प्रतिकृती तयार करून इतिहासाला उजाळा दिला.दिवाळीच्या सुट्टीत मोबाईल चा वापर न करता बालकांना शिक्षणाबरोबर संस्कृती आणि परंपरेची जोड देणारा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमेश्वर पंचक्रोशीतील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडले. तब्बल ₹ २५,००० चे पहिले बक्षीस आणि त्यानंतर हजारो रुपयांची इतर बक्षीसे व पारितोषिके देण्यात आली.
कांबळेश्वर गावाने यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कांबळेश्वर ग्रामस्थ यांनी शिवा काका कारंडे फाउंडेशनचे प्रमुख स्वप्निल कारंडे यांचा चांडाळ चौकडी फेम भरत शिंदे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी कांबळेश्वर ग्रामस्थ याचबरोबर सचिन खलाटे, अमोल जगताप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मदने हे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
▪️स्वप्निल कारंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
मातीतल्या कलाकाराच्या हस्ते मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी लाख मोलाचा आहे.हा सन्मान म्हणजे फक्त गौरव नाही, तर समाजासाठी अजून चांगले काम करण्याची प्रेरणा आहे. असे मत करंडे यांनी व्यक्त केले. कांबळेश्वर ग्रामस्थांचे मनापासून आभार…!





0 Comments