Baramati | निंबुतमध्ये सुनंदा रमेश काकडे यांच्या अस्थी विसर्जन सोहळ्यात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश

 



सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

                       निंबुतचे माजी सरपंच श्री. राजकुमार बनसोडे व श्री. भिमराव (आण्णा) बनसोडे यांच्या ज्येष्ठ भगिनी सुनंदा रमेश काकडे यांचे रविवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. त्यांचा अस्थी पूजन व विसर्जन कार्यक्रम निरा नदीकाठी वैकुंठ स्मशानभूमी येथे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.


आपल्या प्रिय भगिनीच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या हेतूने काकडे परिवाराने एक अनोखी सामाजिक जाणीव जपत त्यांच्या माहेरील अंगणातील छोट्या बागेमध्ये वडील बुध्दवाशी केरबा (बापू) बनसोडे यांच्या समाधी शेजारील आंब्याच्या झाडाखाली अस्थी ठेवण्यात आल्या. या कृतीतून नदी प्रदूषण कमी करण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा मोलाचा संदेश समाजाला दिला गेला.


या कार्यक्रमाला धायरी (पुणे) येथील पुज्य भंते एस. प्रियदर्शिनी, बौद्धाचार्य दादासाहेब गायकवाड, तसेच सुनंदा (बाई) काकडे यांची मुले विशाल, प्रवीन, अमोल, सुना, नातवंडे आणि बनसोडे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.


यानंतर पुण्यानुमोदन व शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित नातेवाईकांनी सुनंदा (बाई) यांच्या आठवणींना उजाळा देताना भावनिक वातावरण निर्माण झाले.


शेतकरी कृती समितीचे नेते श्री. सतिश (भैय्या) काकडे यांनीही उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि काकडे परिवाराच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments