सोमेश्वरनगर : प्रतिनिधी.
बारामती-निंबुत येथे धैर्यशील काकडे मित्रमंडळ, व रमेशभैय्या काकडे (इनामदार) फाउंडेशन निंबूत यांच्या पुढाकाराने एक अनोखा आणि प्रेरणादायी धार्मिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत निंबूत व परिसरातील शेकडो महिलांना शिखर शिंगणापूर, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि येरमाळा या पवित्र स्थळांचे दर्शन घडविण्यात आले.
युवा उद्योजक धैर्यशील काकडे आणि त्यांच्या पत्नी समीक्षा काकडे यांच्या संकल्पनेतून हा प्रवास आयोजित करण्यात आला होता. दोन आरामदायी प्रवासी बसमधून महिलांना सुरक्षित व सुखकर प्रवासाची सोय करण्यात आली होती.
प्रवासाची सुरुवात शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या दर्शनाने झाली. त्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाने महिलांनी ‘पांडुरंग हरी’च्या नामस्मरणात तल्लीन झाल्या. पुढे अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत महिलांनी अध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतला. दुसऱ्या दिवशी तुळजापूरच्या भवानी मातेला वंदन करून येरमाळा मातेच्या चरणी त्यांनी अंतिम आरती केली.
दोन दिवस चाललेल्या या प्रवासादरम्यान चहा, नाश्ता, जेवण, पाणी व राहण्याची उत्तम सोय धैर्यशील काकडे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली होती. या आयोजनात सत्यशील काकडे, गणेश लकडे, विराज जगताप आणि किरण काकडे यांनी समर्पितपणे काम पाहिले, तर महिलांसाठी विशेष व्यवस्था शिवानी जगताप आणि निंबूत ग्रा. पंचायत सदस्या विद्या काकडे यांनी सांभाळली.
या भाविक सहलीचा समारोप निंबूत येथील निष्णाई माता मंदिरात आरतीने करण्यात आला. या प्रसंगी निंबूतचे ज्येष्ठ नेते विजय काकडे व सामाजिक कार्यकर्त्या स्वाती काकडे उपस्थित होते.
देवदर्शनाची ही दिव्य अनुभूती घेतल्यानंतर शेकडो महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे तेज झळकत होते. सर्वांनी धैर्यशील काकडे मित्रमंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करून अशा धार्मिक सहली नियमितपणे आयोजित व्हाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली.






0 Comments