बारामती (प्रतिनिधी):
बारामती तालुका राष्ट्रवादी च्या अध्यक्षपदी संदीप बांदल यांची निवड करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नावावर विश्वास दाखवत ही जबाबदारी सोपवली आहे. काही दिवसांपासून तालुकाध्यक्ष बदलाबाबत पक्षात चर्चेला उधाण आले होते, मात्र शेवटी अजितदादांनी अचानकपणे घेतलेल्या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयामुळे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे.
संदीप बांदल हे यापूर्वी बारामती पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले असून, प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि कार्यकर्त्यांशी असलेले स्नेहबंध लक्षात घेऊन त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास टाकला आहे.
संदीप बांदल यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, “सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळाली” अशी भावना व्यक्त होत आहे. अजितदादांनी योग्य वेळ साधून नवा आणि तरुण चेहरा पुढे आणल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
या निवडीबद्दल संदीप बांदल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले असून, “सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष बळकट करणार” अशी प्रतिक्रिया दिली आहे.




0 Comments