Purandar | जेजुरी निवडणूक रणधुमाळीला उधाण..! ..या तीन पक्षांच्या आघाडी चर्चांना वेग, तर भाजपचा ‘एकला चलो रे’ चा नारा..!

 

                        पुरंदर रिपोर्टर Live 

जेजुरी | विजय लकडे 


                  जेजुरी नगरपरिषद निवडणुका जवळ येताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांमध्ये आघाडीची जलदगतीने चर्चा सुरू असून या महत्त्वाच्या समीकरणाचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार ८ डिसेंबर रोजी पुण्यातील बैठकीत घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



या आघाडीची जुळवाजुळव करण्यासाठी दिलीप बारभाई, जयदीप बारभाई, गणेश निकुडे आणि रोहिदास कुंभार हे प्रमुख समन्वयक रणनिती आखताना दिसत आहेत. आमदार विजय शिवतारे यांची भूमिका देखील या सर्व गणितात निर्णायक ठरणार असून त्यांच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.





दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष व देवसंस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त संदीप जगताप यांनी स्वतंत्रपणे मैदानात उतरताच निवडणूक आणखी रंगतदार झाली आहे. तसंच पुणे जिल्हा माहिती अधिकार कायदा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते हरिदास रत्नपारखी यांनी परिपत्रकातून जनतेशी संवाद साधत नगराध्यक्षपदासाठी मतदान करण्याचे आवाहन सुरू केले आहे.



भाजपचा स्वबळाचा नारा — ‘एकला चलो रे!’


    एका बाजूला आघाडीचे राजकारण वेग घेत असताना, दुसऱ्या बाजूला भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार टेकवडे आणि बाबा जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उमेदवारांसोबतच्या बैठका सुरू केल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपातून सुधीर गोडसे, अजिंक्य जगताप-देशमुख, सचिन सोनवणे आणि सचिन पेशवे ही नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत.


भाजपची प्रचारयंत्रणा ‘एकला चलो रे’च्या मोडमध्ये सज्ज झाली असून पक्ष स्थानिक पातळीवर दमदार लढत देणार असल्याचे चित्र तयार झाले आहे.


जेजुरीत तिरंगी लढत की बहुकोनी संघर्ष?


      एका बाजूला तीन पक्षांची संभाव्य आघाडी, दुसरीकडे भाजपची स्वबळाची रणनीती आणि त्यात संभाजी ब्रिगेड तसेच स्वतंत्र उमेदवारांनीही मैदानात उडी घेतल्याने जेजुरीची निवडणूक अभूतपूर्व चुरशीची होणार हे आता स्पष्ट झाले आहे.


Post a Comment

0 Comments