Baramati | निंबूत–कांबळेश्वर जिल्हा परिषद गटात डॉ,कुलदीप काकडे चर्चेत..!



सोमेश्वरनगर; प्रतिनिधी 

               पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच बारामती तालुक्यातील निंबूत–कांबळेश्वर जिल्हा परिषद गटात राजकीय तापमान वाढले आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार असून या गटातील उमेदवारीसाठी अनेक इच्छुक ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधून सज्ज झाले आहेत.



या सगळ्यात सर्वाधिक चर्चा होत आहे ती बारामती व पुरंदर तालुक्यात दंतचिकित्सक म्हणून नावाजलेले डॉ. कुलदीप काकडे यांच्या नावाची. आरोग्यसेवा, सामाजिक कामे आणि शांत, अजातशत्रू स्वभावामुळे त्यांचे नाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पुढे येताना दिसत आहे.



 
गेल्या दहा वर्षांपासून कल्याणी डेंटलच्या माध्यमातून त्यांनी सोमेश्वर पंचक्रोशीमध्ये शेकडो आरोग्य शिबिरांचे आयोजन केले असून यातून हजारो नागरिकांना उपचार आणि मार्गदर्शन मिळाले आहे. पूरस्थिती असो वा इतर आपत्ती, काकडे यांनी स्थानिक नागरिकांसह पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवण्याचे कार्य केले आहे.


पंचक्रोशीतील गोरगरिबांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये अल्पदरात उपचार मिळावेत यासाठी स्वतः पुढाकार घेऊन दाखल प्रक्रिया ते उपचार यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. गंभीर आजारांचे निदान व मोफत दंतउपचार या सेवेमुळे ते जनतेच्या जवळचे ‘आरोग्यदूत’ म्हणून ओळखले जातात.





राजकारणात पडद्यामागे अनेक निवडणुकीत हालचाली करून विजयात सिंहाचा वाटा उचलणारे, पण स्वतःच्या कामाचा कोणताही गाजावाजा न करणारे काकडे हे अजातशत्रू कार्यकर्ते म्हणूनही प्रसिद्ध आहेत.


सध्या ते एका राष्ट्रीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून “कामाला लागा” असा संकेत मिळाल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे. त्यामुळे निंबूत–कांबळेश्वर जिल्हा परिषद गटात त्यांच्या उमेदवारीसंदर्भातील हालचालींना आणखी वेग येताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments