निरा : विजय लकडे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच पुरंदर तालुक्याच्या राजकीय पटलावर राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळणारे, पुरंदर तालुक्यात आम आदमी पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवणारे, तालुक्यातील निरा गावचे युवक नेते महेश जेधे यांनी आज शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश करून सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या.
पुरंदरेश्वरा सासवड येथे आमदार, माजी मंत्री विजय शिवतरे यांच्या निवासस्थानी शिवसेना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती अतुल मस्के , शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र पटणे, गणेश गडदरे, नितीन केदारी, अकबर सय्यद, सामाजिक कार्यकर्ते टी.के.जगताप यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते
महेश जेधे यांच्या प्रवेशामुळे पुरंदर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा आहे.
“माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या कामाचा वेग, प्रामाणिकपणा, जनसंपर्क, पुरंदरच्या मतदारा प्रती असलेली निष्ठा पाहून मी प्रभावित झालो आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे, तसेच कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता शिवसेनेत प्रवेश केला,” असे महेश जेधे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
तसेच, आम आदमी पक्षातून आणखी काही महत्त्वाचे कार्यकर्ते पुढील काही दिवसांत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत असून, महेश जेधे यांना शिवसेनेमध्ये मोठे पद मिळण्याची देखील शक्यता आहे. तसेच आणखी काही आम आदमी पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळ्याच्या तयारीला देखील वेग आला आहे.





0 Comments