बारामती नगरपरिषद निवडणूक : उद्या बारामतीत अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची सांगता सभा


              पुरंदर रिपोर्टर Live 

बारामती | विजय लकडे.   

            बारामती नगरपरिषद निवडणुकीचा अंतिम टप्पा आता हाताशी आला असून मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी उद्या रविवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य सांगता सभा आयोजित करण्यात आली आहे. बारामती शहरातील शारदा प्रांगण येथे सायं. ६.३० वाजता ही सभा पार पडणार असून शहरवासीयांचे लक्ष या सभेकडे लागले आहे.

              या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासह ४२ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी आठ उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे उर्वरित ३४ जागांवर निवडणूक होत आहे. यामधील प्रभाग क्र. १३ ब आणि १७ अ या दोन जागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून आता ३२ जागांसाठी मतदान होणार आहे.

 

            राष्ट्रवादी, भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. बारामती नगरपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रभावी एकहाती सत्ता कायम राहिल्याचे चित्र असून या निवडणुकीतही त्यांचे पारडे जड असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन सातव यांची स्थिती मजबूत असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.

   तथापि, काही प्रभागांत अपक्ष उमेदवारांच्या मैदानात उतरण्यामुळे निवडणुकीत उत्सुकता आणि चुरस वाढली आहे. परिणामी उद्याच्या अजितदादांच्या सभेत ते कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार, कोणते संदेश देणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

    बारामतीतील शारदा प्रांगणात होणारी ही सभा निवडणुकीच्या वातावरणाला आणखी रंगत आणणार एवढे मात्र निश्चित!

Post a Comment

0 Comments