दौंड : प्रतिनिधी
व्हॉट्सअॅप स्टेटसवर आत्महत्येचा इशारा देणारा भावनिक संदेश आणि मुलीचा फोटो पोस्ट करून अचानक बेपत्ता झालेल्या पोलिस नाईक निखिल रणदिवे यांच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल पाच दिवस बेपत्ता राहिल्यानंतर रणदिवे काल मध्यरात्री सुखरुप घरी परतले असून पोलिस दलासह कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
निखिल रणदिवे हे यवत पोलिस ठाण्याअंतर्गत केडगाव पोलीस चौकीत कार्यरत आहेत. त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली होती. स्टेटस टाकल्यानंतर त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि ते गायब झाल्याने नातेवाईकांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर यवत, शिक्रापूर पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली.
वरिष्ठांवरील गंभीर आरोपामुळे ताण वाढल्याचे रणदिवे यांचे स्टेटस
निखिल रणदिवे यांनी स्टेटसमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या वागणुकीबाबत गंभीर आरोप केले होते.
त्यांनी लिहिल्यानुसार—
- गेल्या वर्षभरापासूनचा मानसिक छळ
- मनमानी आदेश
- वारंवार दूरस्थ ठिकाणी ड्युटी देणे
- आजारी मुलीकडे वेळ न देता येणे
- शिक्रापूर बदलीनंतर रिलीव्हिंगमध्ये झालेला विलंब
या सर्व कारणांमुळे ते प्रचंड तणावात होते.
स्टेटसनंतर ते अचानक गायब झाल्याने संशय अधिक गडद झाला होता.
रात्री सुखरूप परतले; पोलिसांकडून चौकशीची शक्यता
निखिल रणदिवे काल मध्यरात्री सुखरूप घरी परतले, अशी माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी दिली. त्यांच्या परतण्याने कुटुंबीय व सहकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.मात्र वरिष्ठांविरुद्ध केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणात स्वतंत्र चौकशी होण्याची शक्यता अधिक आहे.
पीआय नारायण देशमुख यांच्यावर यापूर्वीही आरोप
पीआय नारायण देशमुख यांच्या कारभाराबाबत याआधीही काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर तक्रारी केल्या होत्या. ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आता या प्रकरणी वरिष्ठांकडून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



0 Comments