Crime | बारामतीतील निष्पाप तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त; कलेच्या आड घाणेरडा कट उघड..!

 



नृत्याची आवड असलेल्या एका निष्पाप तरुणीला कलेचे आमिष दाखवून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची एक संतापजनक घटना समोर आली आहे. बारामती येथील तरुणीला अंबाजोगाईत आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी एका मुख्य संशयित महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कलेच्या नावाखाली केली फसवणूक..!

             बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, २४ एप्रिल २०२५ रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ नावाच्या महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला होता. आमच्या पायल कलाकेंद्रामध्ये नृत्यासाठी मुलींची गरज आहे. तुमच्या मुलीला तिथे नृत्याचे प्रशिक्षण मिळेल आणि चांगला पगारही मिळेल, असे खोटे आमिष तिने आईला दाखवले. घरची परिस्थिती आणि मुलीची आवड लक्षात घेता आईने तिला अंबाजोगाईला पाठवण्याचा निर्णय घेतला.




मारहाण आणि बलात्कार

          पीडित मुलगी अंबाजोगाईत पोहोचल्यानंतर तिला पायल कलाकेंद्र येथे नेण्यात आले. मात्र, तिथले वातावरण पाहून तरुणीने तिथे राहण्यास आणि काम करण्यास स्पष्ट नकार दिला. या रागातून बदामबाई आणि तिच्या इतर दोन साथीदारांनी पीडितेला दया न माया दाखवता तिला बेदम मारहाण केली. तिला जबरदस्तीने शहरातील साई लॉज येथे नेण्यात आले. तिथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या हवाली केले. यानंतर ती स्वतः तिथून निघून गेली. या लॉजवर मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.


या अत्याचारानंतर नराधमांनी पीडितेला पुन्हा पायल कलाकेंद्र येथे आणून सोडले. तिथे तिला डांबून ठेवून वेश्याव्यवसाय करण्यासाठी धमकावण्यात आले. मात्र, पीडितेने हिंमत न हारता गुप्तपणे आपल्या आईशी संपर्क साधला आणि घडलेला प्रकार रडत सांगितला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आईने तात्काळ अंबाजोगाई गाठले. त्यानंतर स्थानिक मदतीने मुलीची तिथून सुटका करून तिला बारामतीला सुरक्षित आणले.



परिसरात मोठी खळबळ..!


पीडितेच्या आईने या घटनेनंतर तात्काळ बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड तसेच एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मात्र, ही घटना अंबाजोगाई परिसरातील असल्याने सदर गुन्हा पुढील तपासासाठी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.


या प्रकरणात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अंतर्गत बलात्कार, मारहाण आणि धमकावणे यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, या घटनेशी संबंधित पायल कलाकेंद्र आणि साई लॉजच्या मालकांचीही पोलीस चौकशी सुरू असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.


सध्या पोलीस आरोपींच्या शोधात असून, या गंभीर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस प्रशासनाकडून पुढील कारवाई वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments