निरा | प्रतिनिधी
निरा येथे आयोजित करण्यात आलेली ५ वी राज्यस्तरीय थोडा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५–२६ मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत राज्यातील ७ जिल्ह्यांतील १७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कौशल्ये सादर केली. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी दाखवलेली चुरस, एकाग्रता व क्रीडावृत्ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती.
या चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला. सातारा जिल्ह्याने द्वितीय, सोलापूर जिल्ह्याने तृतीय, तर पुणे जिल्ह्याने चतुर्थ क्रमांक मिळवत यश संपादन केले. सर्व विजेत्या संघांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
बक्षीस वितरण सोहळ्यास किरण तांबे,विजय लकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करत थोडा स्पोर्ट्ससारख्या बौद्धिक खेळातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, संयम व निर्णयक्षमता विकसित होत असल्याचे मत व्यक्त केले.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन सुनील खताळ यांनी अत्यंत उत्कृष्ट व नियोजनबद्ध पद्धतीने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी थोडा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्रचे महासचिव ग्रँडमास्टर चंद्रकांत राहिंज , सुनील खताळ, सागर लबडे , सोमनाथ शेलार, वैशाली बांगर , योगेश वागस्कर, अक्षय खोमणे , रोहित गायकवाड व आकांक्षा राहिंज यांनी मोलाची कामगिरी बजावली.
संपूर्ण स्पर्धा खेळाडू, प्रशिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरली असून, भविष्यात थोडा स्पोर्ट्सला आणखी व्यापक स्तरावर नेण्यासाठी ही चॅम्पियनशिप प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



0 Comments