BARAMATI | ओबीसी बहुजनांची एकजूट अधिक बळकट; २ जानेवारीला लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे, काळुराम चौधरी यांचा बारामती तालुक्यात संवाद दौरा..



बारामती | प्रतिनिधी 

           ओबीसी समाजाच्या राजकीय एकजुटीला अधिक बळ देण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे व काळुराम चौधरी हे सोमवार, दिनांक २ जानेवारी रोजी बारामती तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात मोरगाव, सुपा, कऱ्हाटी, वडगाव निंबाळकर, मुढाळे, लोखंडवाडी व पणदरे या प्रमुख गावांचा समावेश असून, ओबीसी व बहुजन समाजाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.



               बारामती नगरपालिका निवडणुकीदरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काळुराम चौधरी तसेच अपक्ष उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. या प्रचाराला अनेक ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद मिळून यशही प्राप्त झाले. विशेषतः संघमित्रा काळुराम चौधरी व वनिता अमोल सातकर या उमेदवारांनी बहुमताने विजय मिळवत ओबीसी बहुजनांची ताकद दाखवून दिली.


ओबीसी बहुजन समाज एकत्र आल्यास प्रस्थापित राजकारणाला प्रभावी पर्याय उभा राहू शकतो, हे या निकालांतून स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये बारामती तालुक्यात ओबीसी व बहुजन समाज एकजुटीने मैदानात उतरणार असून, अनेक ठिकाणी विजय मिळेल, असा ठाम विश्वास बापूराव सोलनकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला




२ जानेवारीचा हा संवाद दौरा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, ओबीसी समाजाच्या संघटन, जनजागृती आणि राजकीय दिशा ठरविण्यासाठी निर्णायक ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments