सोमेश्वरनगर | प्रतिनिधी.
कृषी विभागाच्या जनजागृती उपक्रमांतर्गत शिवा काका कारंडे फाऊंडेशनच्या माध्यमातून भारूड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेणुका कारंडे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रभर गाजणारे सुप्रसिद्ध भारूड सम्राट ह.भ.प. कृष्णा महाराज जोगदंड यांचे सदोबाचीवाडी, कोऱ्हाळे खुर्द, लाटे, शिरसने, सस्तेवाडी माळवाडी व सोरटेवाडी अशा तब्बल सात गावांमध्ये भारूड कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाले.
कृष्णा महाराजांनी आपल्या खास विनोदी शैलीतून भजन, अभंग, पोवाडा, गौळणी व भैरवीच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. गावकी-भावकीतील वाद, समाजात वाढत चाललेल्या फळी-फुटीची व्यथा त्यांनी प्रभावीपणे मांडली. जिजामाता यांच्या संस्कारांप्रमाणे बालपणापासूनच शिवरायांसारखे संस्कार घडवण्यासाठी आई-वडिलांनी प्रथम स्वतःच्या आचरणातून आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले. युवा पिढी अध्यात्माकडे वळावी, यासाठीच आम्हाला गावोगावी भारूड सादर करावे लागत असल्याची खंतही महाराजांनी व्यक्त केली.
आपल्या सुमधुर आवाजाने व प्रभावी सादरीकरणाने कृष्णा महाराजांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या भारूड सप्ताहाचा परिणाम असा झाला की, शिवा काका कारंडे फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेणुका कारंडे, स्वप्निल कारंडे यांना कृष्णा महाराजांचा अध्यात्मिक सहवास लाभला. त्यातून प्रेरणा घेऊन एकादशीनिमित्त उभयतांनी पंढरपूरला जाऊन माळ परिधान करत समाजप्रबोधनाची सुरुवात स्वतःपासून केली व एक नवा आदर्श निर्माण केला. या आदर्शवत भूमिकेमुळे परिसरात या जोडप्याचे विशेष कौतुक होत आहे.
कार्यक्रमादरम्यान कृष्णा महाराजांनी फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमांवर आधारित, गुरु चंदनजी कांबळे लिखित
“विकासाच्या नव पर्वाचं हे जनरेशन,
जनतेच्या आशेचं आहे एकच सोल्युशन,
समाजाच्या हितासाठी शिवा काकाच फाऊंडेशन”
हे गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी स्वप्निल कारंडे यांनी शेतकरी बांधवांना ऊस व्यवस्थापन, कृषी विभाग व पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती सोप्या व अचूक भाषेत दिली. तसेच शिवा काका कारंडे फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण व सामूहिक विवाह सोहळ्या बाबतही माहिती देण्यात आली.भारूड सप्ताहामुळे अध्यात्म, समाजप्रबोधन आणि कृषी जनजागृती यांचा सुंदर संगम साधला गेला असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे .

0 Comments