बारामती | विजय लकडे
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सातत्यपूर्ण व परिणामकारक कामगिरी करत बारामती नगरपरिषदेनं “माझी वसुंधरा अभियान ५.०” या राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ४० हजार ते १ लाख लोकसंख्या गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत बारामती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्यभरातून तिचे कौतुक होत आहे.
“माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी व आकाश या पंचतत्त्वांवर आधारित विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, जलसंधारण, स्वच्छता मोहीम, ऊर्जा बचत तसेच जनजागृती अभियान अशा अनेक उपक्रमांत बारामती नगरपरिषदेने प्रभावी कार्य केले. स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था, अधिकारी व कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागामुळे हे यश शक्य झाल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल बारामती नगरपरिषदेचा सन्मान राज्यस्तरीय “माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्या”त करण्यात येणार आहे. हा सोहळा शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. कार्यक्रमास मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास), मा. उपमुख्यमंत्री (राज्य उत्पादन शुल्क), मा. मंत्री (पर्यावरण व वातावरणीय बदल) यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, या यशामागे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विविध विकास उपक्रमांचे मोठे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या प्रेरणेने नगरपरिषद प्रशासनाने पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन विकासाला प्राधान्य देत विविध योजना राबवल्या.
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती नगरपरिषदेचे अभिनंदन करत पुढील काळातही पर्यावरण क्षेत्रात आघाडी कायम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच नगराध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष श्वेता नाळे, मुख्याधिकारी पंकज भुसे आणि सर्व पदाधिकारी यांनी नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.
याचबरोबर २०२६ मधील स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशपातळीवर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला असून, बारामती शहराच्या पर्यावरणपूरक वाटचालीत नागरिकांनी यापुढेही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.


0 Comments