पुरंदर रिपोर्टर Live
निरा. प्रतिनिधी.
निरा–कोळविहिरे जिल्हा परिषद गटात भाजपच्या अधिकृत उमेदवार सिमा संदीप धायगुडे यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून संपूर्ण गटात निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांचे कट्टर समर्थक आणि ‘अजातशत्रू’ अशी ओळख असलेले संदीप धायगुडे यांच्या सुविद्य पत्नी सिमा धायगुडे यांची उमेदवारी सध्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
निरा–कोळविहिरे जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात सिमा धायगुडे यांनी भाजपच्या पंचायत समितीच्या उमेदवार व महिला कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात त्यांनी गावोगावी भेटी देत मतदारांच्या समस्या ऐकून घेतल्या असून त्यांच्या प्रचाराचा झंझावात संपूर्ण गटात पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे पारडे जड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गावभेटी दरम्यान महिला, शेतकरी, युवक व ज्येष्ठ नागरिकांकडून सिमा धायगुडे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना त्यांनी माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा परिषद गटात विकासाची गंगा आणण्याची ग्वाही दिली. केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कृतीतून काम करून दाखवेन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याने गावागावात त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.
महिला बचतगटाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा व शिक्षण या मूलभूत विषयांवर सिमा धायगुडे यांनी ठोस व स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्रचारावेळी त्या म्हणाल्या, “निरा–कोळविहिरे जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा आहे. केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करून जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा माझा प्रयत्न असेल.” महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
दरम्यान, सिमा धायगुडे यांचे पती संदीप धायगुडे हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत. भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार, तसेच पतसंस्थेच्या माध्यमातून व्यवसायासाठी आर्थिक हातभार दिला आहे. निरा–शिवतक्रार ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रामाणिकपणे मांडले असून काही प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यात सिमा धायगुडे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी ऊर्जा दिसून येत आहे. निरा–कोळविहिरे गटात सिमा धायगुडे यांच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण तापले असून त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे. विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित असलेली ही निवडणूक लढत कोणाच्या पारड्यात जाणार, याकडे संपूर्ण पुरंदर तालुक्याचे लक्ष लागले आहे.


0 Comments