मु. सा. काकडे महाविद्यालयात जिल्हास्तरीय रोजगार महामेळावा संपन्न. १५२ उमेदवारांना नोकरीची संधी.

 


पुरंदर रिपोर्टर Live .   

सोमेश्वरनगर.   प्रतिनिधी.  

             महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जिल्हास्तरीय रोजगार महामेळावा उत्साहात पार पडला.

                महामेळाव्यात जिल्ह्यातील विविध भागांतील एकूण २० कंपन्यांनी सहभाग नोंदवला. एकूण ३५७ उमेदवारांनी मुलाखती दिल्या, त्यापैकी १५२ उमेदवारांची विविध पदांसाठी निवड करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

                 महामेळाव्याचे उद्घाटन माजी विद्यार्थी आर. एन. शिंदे सभागृहात पार पडले. उद्घाटक म्हणून उद्योजक आर. एन. शिंदे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन अभिजीत काकडे, अध्यक्षस्थानी प्राचार्य देविदास वायदंडे होते. यावेळी व्यवस्थापन समितीचे सचिव सतीश लकडे, महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास अधिकारी राजेश धर्माधिकारी, रामेश्वरी पालवी, राजू डोईफोडे व अजय रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

                अध्यक्षीय भाषणात प्राचार्य देविदास वायदंडे यांनी सध्याच्या स्पर्धात्मक काळात युवकांसमोरील वाढती आव्हाने आणि घटते रोजगाराचे प्रमाण लक्षात घेता अशा रोजगार मेळाव्यांचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यातही महाविद्यालयातर्फे अशा उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.



                  कौशल्य विकास अधिकारी राजेश धर्माधिकारी यांनी शासन ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. युवकांनी आपल्या अंगी आवश्यक पात्रता व कौशल्य विकसित केल्यास नोकरीच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होतील, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा व राज्य पातळीवर शासनाकडून अशा मेळाव्यांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

                 कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोजगार मेळाव्याचे समन्वयक प्रा. राहुल खरात यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अच्युत शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. आरती भाग यांनी केले.उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                जिल्हास्तरीय रोजगार महामेळाव्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments