निरा | प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे पिंपरे खुर्द परिसरात मोठे नुकसान झाले. पिंपरे खुर्द येथील मालोजी सोमा अवघडे व संगीता अवघडे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यात उडून गेल्यानंतर घराची भिंत अचानक कोसळल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.
सायंकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांमुळे घराच्या भिंतीला तडे जाऊन ती अचानक कोसळली. भिंत अंगावर पडल्याने मालोजी अवघडे व संगीता अवघडे यांच्या हात, पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.
या दुर्घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरातील संसारोपयोगी वस्तूंचीही हानी झाली आहे. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त गरीब कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


0 Comments