शिवजयंतीनिमित्त १० किमी भव्य सायकलिंग स्पर्धा; सोमेश्वरनगरमध्ये बाल सायकलपटूंचा उत्साह उसळणार

 


पुरंदर रिपोर्टर Live.   

सोमेश्वरनगर.   प्रतिनिधी.  


              सोमेश्वरनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी भव्य सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सोमेश्वर सायकलिंग क्लब व सचिन आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असून परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

           इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ही १० किलोमीटर सायकलिंग स्पर्धा दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन सोमेश्वर मंदिर येथे पोहोचून पुन्हा पुतळ्यापर्यंत परतीचा प्रवास असा निश्चित करण्यात आला आहे.

        स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आणि सहभागी बाल सायकलपटूंच्या सुरक्षिततेसाठी आयोजकांनी नागरिक, प्रवासी आणि शिवप्रेमींना विशेष सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 


*नागरिकांसाठी सुरक्षा सूचना*


१. स्पर्धा सकाळी ७ ते ९ या कालावधीत होणार असल्याने नागरिकांनी खालील बाबींची काळजी घ्यावी, असे आयोजकांनी सांगितले आहे:

२.  वाहन वेग मर्यादित ठेवावा तसेच शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा.

३.   सायकलपटूंना पुरेसा रस्ता देऊन कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

४.  रस्त्याच्या कडेला उभे राहून टाळ्यांच्या गजरात बाल मावळ्यांचा उत्साह वाढवावा, मात्र स्पर्धेच्या मार्गात प्रवेश करू नये.

५.   मार्गावर तैनात असलेल्या स्वयंसेवक व सुरक्षा पथकाला सहकार्य करावे.

          या स्पर्धेमुळे परिसरात शिवजयंती उत्सवाला क्रीडा रंग चढणार असून, विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम आणि शिस्तीची भावना रुजविण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments